पुणे : सायबर साक्षरतेबरोबरच सायबर सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके यांनी केले. महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि यासंदर्भातील कायद्याची माहिती व्हावी, यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुणे जिल्ह्यात ‘सायबर सेफ वुमन’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सासवड येथील पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये झालेल्या या कार्यशाळेस जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, प्राचार्य हनीफ मुजावर, महिला दक्षता समितीच्या जिल्हा प्रमुख प्रिया पावशे, सदस्या सीमा वचकल, संदीप किरवे, बी.ई.घुले, विलास कसबे हे उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र सायबर यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली. डिजिटल युगात इंटरनेटच्या माध्यमातून अनेक प्रकारचे सायबर गुन्हे होत आहेत. यामध्ये विशेषतः महिला व बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. इंटरनेटच्या मदतीने महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आदी गुन्हे होत आहेत. सायबर गुन्ह्यांची तसेच अशा गुन्ह्यासंदर्भातील कायद्यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, यासाठी महाराष्ट्र सायबरच्या वतीने पुणे जिल्हयात सासवड आणि पिरंगुट या दोन ठिकाणी ‘सायबर सेफ वुमन’ ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.
या मोहिमेत जबाबदार नेटिझन्स तयार करण्यासाठी जागरूकता हा एक महत्वाचा पैलू असून या मोहिमेमुळे महिला आणि मुलांना चांगल्या सायबर पद्धतींविषयी जागरूकता करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या मोहिमेसाठी विशेष पुढाकार घेतला.
प्रारंभी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दिलेला संदेश दाखविण्यात आला. बदलत्या काळात गुन्हेगारी विश्वही नवनवीन माध्यमांचा वापर करत आहे. डिजिटल युगात गुन्हेगार इंटरनेटचा वापर करून सायबर गुन्हे करत आहेत. त्यातून महिला व बालकांचे लैंगिक शोषण व फसवणूक करत आहेत. अशा घटनाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी ‘सायबर सेफ वुमन’ ही मोहिम महत्त्वाची ठरणार, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी संदेशात व्यक्त केला.
त्यानंतर उपस्थित विद्यार्थिनींना दृक श्राव्य माध्यमाद्वारे मोबाईल, संगणक वापर करताना घ्यावयाची काळजी याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी हाके म्हणाले की, आजच्या युगात मोबाईल म्हणजे श्वास व ध्यास झाला आहे. परंतु, मोबाईल व संगणक वापरताना पुरेशी माहिती नसल्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळेच आपण सायबर साक्षर होणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनामध्ये इंटरनेट बँकींग, ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन गेम्स, मनोरंजन, शिक्षण, ऑनलाईन संवाद, सोशल माध्यम याकरिता करीता इंटरनेटशी संबध येतो. त्यामुळे त्याचा वापर होताना पुरेशी काळजी घेतली जावी, असे सांगितले. याशिवाय इंटरनेटवरील फिशिंग, वैवाहिक विषयक साईटवरील फसवणूक, ओळख, चोरी, फोटोमधील फेरबदल, बँकांसंदर्भातील फसवणूक, बालकांसंदर्भातील पोर्नोग्राफी, सायबर बुलिंग, ऑनलाईन गेमिंग, खोटी माहिती देणारी संकेतस्थळे, सायबर मानहानी यांची माहिती व यापासून प्रतिबंधात्मक उपाय यासह सायबर गुन्ह्यासंदर्भातील कायदे तसेच समाजमाध्यम (सोशल मीडिया) वापरण्यासंदर्भातील घ्यावयाची काळजी याची माहिती देण्यात आली.
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रे वाचनाला महत्व दिले पाहिजे असे सांगून वृत्तपत्रे, टीव्हीवरील मालिका यामधून आपल्याला सायबर विषयक फसवणूकीची माहिती मिळू शकते, असे सांगितले. याशिवाय लोकराज्य, दिलखुलास, जय महाराष्ट्र याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेश राणे यांनी केले तर आभार प्रा. नम्रता गौंदाडकर यांनी मानले.