नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं इराकमधल्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हवाई हल्ल्यात, इराणच्या कुड्स या सशस्त्र दलाचा प्रमुख, जनरल कासीम सोलेमनी ठार झाला आहे. या हल्ल्यात किमान आठ जण ठार झाले असून व्हाइट हाउस आणि अमेरिकेची संरक्षण विषयक संस्था पेंटॅगॉननं, सोलेमनीच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
इराण कडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांच्या योजना उधळून लावण्यासाठी, अमेरिकनं हा हल्ला केला असून अमेरिकेबाहेर असलेल्या प्रत्येक अमेरिकी कर्मचाऱ्याच्या संरक्षणासाठी ही लष्करी कारवाई केल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या हल्ल्याचा जळजळीत निषेध केला आहे.
अमेरिकनं उघडपणे युद्धाला चिथावणी दिली असून संभाव्य दुष्परिणामांना सामोरं जायला अमेरिकेनं आता तयार राहावं, असा इशाराही इराणनं दिला आहे. दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्लाह खामेनी यांनी सोलेमनीच्या जागी कमांडर म्हणून इस्माईल कानीची नियुक्ती केली.