मुंबई : परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी 35 कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या 35 कोटी रुपयांच्या निधीत करावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम पालकमंत्र्यांकडून निश्चित करून घ्यावा, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने 133.58 कोटी रुपयांचा परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर केला आहे. आराखड्यातील कामे करताना त्यांचा दर्जा सर्वोत्तम राहील याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
वैजनाथ मंदिराच्या पूर्वेस हरिहर तिर्थाजवळ दर्शनी मंडप, प्रतीक्षा गृह,धर्मशाळा, यात्री निवास, स्वच्छतालयांचे बांधकाम, मेरू पर्वताजवळ कॉटेजचे बांधकाम, मेरू पर्वतावर उद्यान विकसित करणे, मंदिराकडे जाणारे रस्ते विकसित करणे, हरिहर तिर्थाजवळ उद्यान विकसित करणे, मंदिर व इतर इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग चे काम करणे, हेलिपॅड, प्रदक्षिणा मार्ग विकसित करणे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करणे, डोंगर तुकाईदेवी पोच रस्त्याची कामे करणे,तुकाई देवी परिसरात उद्यान विकसित करणे, या ठिकाणी काळ्या दगडाच्या दीपमाळ बांधणे अशी अनेक कामे आरखड्यातून करण्यात येत आहेत.
हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. प्रति वर्षी या मंदिराला 30 लाखाहुन अधिक भाविक भेट देतात. या भाविकांना आवश्यक पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या आराखड्याची अंमलबजावणी केली जात आहे. यातील कामे नाविन्यपूर्ण रितीने करण्यात यावीत. त्रिशुळ, डमरू,नंदी यांच्या प्रतीकृती, दर्शन रांगेत ओम नमः शिवायचा जप ऐकू येण्याची व्यवस्था करावी, बेलाच्या जेवढ्या प्रजाती आहेत त्या सर्वांची रोपे इथे लावून बेल वन, महादेव वन तयार करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. आराखड्यातील जी कामे श्रावण महिन्यापूर्वी करता येतील ती प्राधान्याने हाती घ्यावीत, असेही ते म्हणाले. अर्थमंत्र्यांनी मंदिराला पूर्वरूपात आणण्यासाठी एक कोटी रु. चा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही सांगितले.