Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सध्याच्या डिजिटल युगात मुद्रित माध्यमांचे महत्व अबाधित ; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

पुणे : सध्याच्या डिजिटल युगातही मुद्रित माध्यमांचे महत्व अबाधित आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

केसरीवाडा येथे दैनिक केसरीच्या 139 व्या वर्धापन दिनी दैनिक ‘जागरणʼ चे मुख्य संपादक संजय गुप्ता यांना सन 2020 चा ‘लोकमान्य टिळक पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कारʼ महसूल मंत्री श्री. थोरात व  दै. केसरीचे संपादक डॉ. दिपक टिळक यांच्या हस्ते प्रदान करुन सपत्निक गौरविण्यात आले, यावेळी श्री. थोरात बोलत होते. कार्यक्रमात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला संशोधनासाठी, तसेच अनाथ हिंदू महिलाश्रम, वक्तृत्वोत्तेजक सभा, वेदशास्त्रोत्तेजक सभा, वैदिक संशोधन मंडळ यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांना मान्यवरांच्या हस्ते ‘जयंतराव टिळक स्मृती पुरस्कारʼ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी डॉ. दिपक टिळक यांच्या ‘लोकमान्य टिळक ॲण्ड दी मास मीडियाʼ या पुस्तकाचे तसेच रामदास नेहूलकर यांच्या ‘स्मरण लोकमान्यांचेʼ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच दै. केसरीमधील दिपक एरंडे, सुधीर गोसावी, देविदास मिसाळ, राजेंद्र गायकवाड आणि चंद्रकांत कोंढाळकर या निवृत्त सेवकांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास महापौर मुरलीधर मोहोळ, दैनिक केसरीचे संपादक डॉ. दिपक टिळक, डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणती टिळक, तसेच पुरस्कारार्थी संजय गुप्ता यांच्या पत्नी प्रगती गुप्ता, खासदार गिरीश बापट, आमदार संजय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री थोरात म्हणाले, केसरी वाडा ही ऐतिहासिक भूमी आहे. या ऐतिहासिक भूमीत लोकमान्य टिळकांनी देशासाठी केलेले कार्य आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यलढ्यामध्ये लोकमान्य टिळकांचा मोलाचा वाटा आहे. स्वातंत्र्यपुर्व काळातही दै. केसरीला विश्वासार्ह वृत्तपत्र म्हणून लोक ओळखत होते, असे गौरवोद्गार काढून श्री. थोरात म्हणाले,  वृत्तपत्र वाचन ही आपली संस्कृती असून सध्याच्या बदलत्या युगात काळ कितीही बदलला तरी वृत्तपत्रांनी आपले स्थान अबाधित ठेवले आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार देवून सन्मान केला असून यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल.

पुरस्कारार्थी संजय गुप्ता म्हणाले, या पुरस्कारामुळे समाजाबद्दलची बांधिलकी आणखी वाढली असून हा सन्मान माझ्यासाठी पुरस्कार नसून तो आशीर्वाद आहे. लोकमान्य टिळक हे राष्ट्रीय पत्रकार होते. त्यांनी लेखणीद्वारे समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले.

पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र सेवेचा वसा घेतला होता, असे सांगून श्री. गुप्ता म्हणाले, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिलेल्या देशभक्तांचे समर्पण सदैव स्मरणात ठेवायला हवे आणि देशहितासाठी आपण सदैव तत्पर असायला हवे. दै. जागरण च्या पत्रकारितेविषयी माहिती देवून श्री. गुप्ता म्हणाले, पत्रकारांनी पत्रकारिता करताना नैतिक मूल्य जपून, देशभक्तीचे विचार रुजवणारी, सकारात्मक विचारांनी प्रेरित होणारी, समाज सजग होण्यासाठी मार्गदर्शन करणारी, नि:पक्षपाती पत्रकारिता करणे गरजेचे आहे.

पत्रकारांनी समाजाला योग्य दिशा देण्यासाठी नकारात्मक घटनांचेही चित्रण पत्रकारितेतून करायला हवे. पत्रकारांची लेखणी आदर्श विचारांनी प्रेरित असायला हवी, असेही श्री. गुप्ता म्हणाले.

 प्रास्ताविक डॉ. दिपक टिळक यांनी केले. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि पत्रकारितेचे विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version