Site icon साप्ताहिक एकच ध्येय

माळशेज घाट येथे १० जानेवारीपासून माळशेज पतंग महोत्सव

पर्यटकांनी सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने (एमटीडीसी) माळशेज घाट (जि. पुणे) येथील पर्यटक निवास येथे माळशेज पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10, 11 व 12 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या या महोत्सवात पर्यटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी केले आहे.

येणाऱ्या संक्रात सणाचे औचित्य साधून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 ते 12 जानेवारी दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरिता प्रती व्यक्ती 50 रूपये प्रवेश शुल्क आहे. महोत्सवाच्या ठिकाणी पतंग, मांजा व इतर साहित्य खरेदीसाठी स्टॉल असेल. महोत्सव पर्यावरणपूरक असून परिसरामधील पशु, पक्षी यांना कोणतीही हानी अथवा इजा होणार नाही याची संपूर्ण खबरदारी व दक्षता घेण्यात येणार आहे. प्रतिबंध करण्यात आलेल्या कोणत्याही प्रकारच्या मांज्याचा महोत्सवामध्ये वापर करण्यात येणार नाही. हा महोत्सव प्रथमच आयोजित होत असून महोत्सवामध्ये बिन मांज्याचे पतंग, ड्रोन पतंगबाजी ही प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत.

श्री. काळे म्हणाले, राज्यातील एमटीडीसीच्या रिसॉर्टस् तथा पर्यटक निवासांचा आता कायापालट होत असून पर्यटकांना त्याकडे आकर्षित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत आतापर्यंत द्राक्ष महोत्सव, आंबा महोत्सव यांचे आयोजन करुन पर्यटकांना आकर्षित करण्यात आले आहे. आता पतंग महोत्सवाच्या माध्यमातून या पर्यटनस्थळाकडे पर्यटकांना पुन्हा आकर्षित करुन तेथील पर्यटनाला चालना देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

महोत्सवामध्ये पर्यटकांना महिला बचत गटांच्या माध्यमातून बनविण्यात येणाऱ्या विविध स्थानिक खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. ग्रामीण कलाकारांच्या कलाकृतींचे स्टॉलही उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सेंद्रीय खताद्वारे उत्पादित शेतमालाची विक्री करण्यात येणार आहे. आदिवासी नृत्य, महिला लेझीम पथक, गोफ कला अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून पर्यटकांना बैलगाडी सफारीचाही आनंद घेता येणार आहे.

पर्यटकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन पतंग महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन अभिमन्यू काळे, वरिष्ठ व्यवस्थापक क्षिप्रा बोरा, माळशेज घाट पर्यटक निवासचे व्यवस्थापक विष्णू गाडेकर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी माळशेजघाट पर्यटक निवासचे व्यवस्थापक विष्णु गाडेकर यांना 9373808151, 7768036332, 9881143180, 7038890500, 9823714878 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे एमटीडीसीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Exit mobile version