चीन सरकारची मालकी असलेल्या चार बडय़ा टेलिकॉम कंपन्यांना ५ जी सेवा सुरू करण्यासाठी गुरुवारी चीन सरकारने व्यापारी परवाने मंजूर केले. सध्या चीन आणि अमेरिका यांच्यात तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या आघाडीवर तणावपूर्ण संबंध आहेत. या पाश्र्वभूमीवर जगात अतिवेगवान वायरविहिन जाळे तयार करण्यात आघाडी घेण्याची चीनची महत्त्वाकांक्षा दिसून येत आहे.
चीनच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (एमआयआयटी) चीन टेलिकॉम, चीन मोबाइल, चीन युनिकॉम आणि चीन रेडिओ आणि टेलिव्हिजन या कंपन्यांना ‘५जी’चे व्यापारी परवाने दिले आहेत.
५जी हे अत्यंत प्रगत दूरसंपर्क तंत्रज्ञान आहे. सध्याच्या ४जी एलटीई तंत्रज्ञानापेक्षा त्याचा डाऊनलोडचा वेग हा १० ते १०० पट असल्याचे सांगितले जाते. डाऊनलोड-अपलोडच्या या वेगासोबतच अधिक व्यापक क्षेत्रात पोहोच आणि अधिक स्थिर जोडणी, ही या तंत्राची वैशिष्टय़े आहेत.
चिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘५जी’ जाळ्याच्या सर्वागीण वापराने औद्योगिक उत्पादन, इंटरनेटने जोडलेल्या कार, आरोग्यसेवा, स्मार्ट शहरांचे व्यवस्थापन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या विकासाला मदत होणार आहे.
चीनचे उद्योक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री मियाओ वी यांनी सांगितले की, ५जी तंत्रज्ञानामुळे वेगवान मोबाइल सेवा, सुरक्षित आणि व्यापक अशी प्रगत माहिती सुविधा निर्माण होईल.