मुंबई : केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईशी निगडीत पर्यावरण आणि वनांशी संबंधित मुद्यांबाबत आज मुंबईत चर्चा केली. वर्ष 2004 ते 2014 या काळात महाराष्ट्राशी संबंधित असलेले अनेक प्रलंबित मुद्यांचे गेल्या पाच वर्षात निराकरण करण्यात आले आहे.
पर्यावरण रक्षण आणि देशाचा विकास हे दोन्ही एकत्र साध्य करता येऊ शकते हे केंद्र सरकारने सिद्ध केले आहे. पर्यावरण रक्षणाबरोबरच देशाचा विकास साध्य करण्यासाठी सरकार आगेकूच करत आहे असे जावडेकर म्हणाले. आज सुरु झालेली चर्चेची प्रक्रिया सुरुच राहील आणि धोरणात्मक निर्णयाद्वारे प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन त्यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, या संदर्भात सर्व राज्यांशी चर्चा सुरु केली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांशी पर्यावरण, वन आणि हवामान बदलांबाबत आवश्यक त्वरित निर्णयासाठी दखल घेण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राशी संबंधित अनेक प्रकल्प, मागण्या मार्गी लावण्यात आल्या आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी परवानगी, न्हावा-शेवा पूल, नवी मुंबई विमानतळ, मुंबई-गोवा द्रुतगती मार्ग, किनारी रस्ते, मालाडमधला पुनर्वापराबाबतचा प्रकल्प यांचा समावेश असल्याचे जावडेकर म्हणाले.
किनारा नियमनासंदर्भात अधिसूचनेत आपल्या सरकारने काही बदल केले. त्यामुळे या भागात राहणाऱ्या कुटुंबानाही शहरी भागाप्रमाणेच एफएसआयचा फायदा मिळू शकणार आहे. जनतेचे, गरीब जनतेच्या हिताचे आणि पर्यावरण स्नेही अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. एक एकरावरची खारफूटी नष्ट केल्यास 10 एकर जमिनीवर खारफुटीची लागवड करणे अत्यावश्यक आहे अशी तरतूद करणारा कायदा निर्माण करण्यात आल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
देशातल्या पर्यावरण पर्यटन अर्थात इको टुरिझमची क्षमता पूर्णपणे वापरली जावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याबरोबरच आपल्या देशाचा जलदगतीने विकास साधत आपण आगेकूच करत आहोत. सर्व राज्यांशी चर्चेची प्रक्रिया सुरुच ठेऊन धोरणात्मक निर्णय घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
#SelfiewithSapling या अभियानाविषयी बोलताना आपल्याला रोपासमवेत काढलेले हजारो सेल्फी प्राप्त झाले असून लोकांनी याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. अधिकाअधिक लोकांनी यात सहभागी व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे जावडेकर यांनी सांगितले. अनेक राज्यांनीही हे अभियान हाती घेतले आहे. 5 ऑगस्टपर्यंत रोप लागवड सुरु राहील. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणे ‘प्लांट इंडिया’ ही वृक्ष लागवडीची मोहीम हे जनतेचे राष्ट्रीय अभियान ठरावे असा सरकारचा प्रयत्न आहे.
आपली जीवनशैली सुधारली नाही तर त्याचा आपल्या जीवनावर विपरित परिणाम होईल याची जाणीव जनतेला होऊ लागली आहे. जीवनासाठी आपल्याला लागणारे ऑक्सिजनचे प्रमाण लक्षात घेता प्रत्येकाने किमान 10 झाडं लावून ती जगवायला हवीत हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याची भावना जनतेमध्ये बिंबवणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.