व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची लढाई एकत्रित लढण्याचे आवाहन
मुंबई : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त (दि. 6 जानेवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून पत्रकार बांधवांना तसेच समस्त नागरिकांना ‘पत्रकार दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशवासियांचं व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी पुढची लढाई सर्वांनी एकत्र लढूया, असं आवाहनही त्यांनी केले आहे.
बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी त्यांच्या विसाव्या जन्मदिनी ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरु करुन मराठी वृत्तपत्रसृष्टीची सुरुवात केली. ‘दर्पण’ वृत्तपत्रापासून झालेली ती सुरुवात आज हजारो वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, समाजमाध्यमांवर लिहिणाऱ्या लाखो पत्रकारांपर्यंत पोहोचली आहे, याचं श्रेय बाळशास्त्रींना व त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या पत्रकारांना आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी पत्रकार बांधवांचा गौरव केला आहे. समाजमाध्यमांमुळे आज अनेक जण लिहिते झाले आहेत, ही चांगली बाब असली तरी त्यातील सत्य-असत्यतेचा फरक करणं हे मोठं आव्हान आहे. येणाऱ्या काळात या आव्हानावरही तोडगा निघू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशातील लोकशाही, पुरोगामी विचारधारा कायम ठेवण्यात, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यात पत्रकार बांधवांचं योगदान सर्वधिक असून देशवासियांचं व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी या पुढची लढाई आपण सर्वांनी मिळून एकत्र लढूया, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार दिनानिमित्त केलं आहे.