मुंबई : देशातील सर्व प्रमुख कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये मुंबईत आहेत. अशा कंपन्यांनी लघु व मध्यम उद्योगांत अधिक गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करण्यावर अधिक भर द्यावा, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्पोरेट कंपनी सचिवांच्या परिषदेची सांगता उद्योगमंत्री श्री. देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष रणजीत पाण्डेय, कार्यक्रम समन्वयक प्रविण सोनी, अशोक करोडिया, जे. राजशेखर व्ही. के. आदी उपस्थित होते.
उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले, कॉर्पोरेट कंपन्या चालवण्यात सचिवांची भूमिका महत्त्वाची असते. ते पडद्यामागून सर्व सूत्र हलवत असतात. या परिषदेच्या निमित्ताने ते पहिल्यांदाच सर्वांसमोर आले आहेत. राज्यात नुकतेच नवीन सरकार स्थापन झाले असून या नव्या सरकारला ही संस्था सहकार्य करेल, अशी अपेक्षा आहे. रोजगार निर्मिती हे सरकारसमोरचे मोठे आव्हान आहे. रोजगार वाढीसाठी उद्योग विभागाने अनेक योजना आखल्या असून त्यांची अमंलबजावणीदेखील सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कॉर्पोरेट कंपन्यांनीदेखील सहकार्य करून रोजगार निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे.
लघु व मध्यम उद्योगांची संख्या वाढवून त्यांनी मुंबई शेअर बाजार किंवा राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी करून आपल्या व्यवसाय व्यापक करावा, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.
मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र (इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटर) लवकरच सुरू करणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आलेली आहे. याचा फायदा देश विदेशातील उद्योगांना होणार आहे, असेही श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.