नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारताच्या बहुतांशी भागात थंडीची लाट कायम आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीरच्या काही भागांमध्ये पुढचे तीन दिवस पाऊस तसंच बर्फवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेशात पुढचे दोन दिवस पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागानं धोक्याचा नारंगी आणि पिवळा इशारा जारी केला आहे.
हिमाचल प्रदेशात काल तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. शिमला, मनाली, कुफरी, डलहौसी, केयलाँग आणि कालपा इथं किमान तापमान २ ते त ३ अंश सेल्सिअसनं घसरून शुन्याखाली गेल्यानं कडाक्याची थंडी होती. जम्मू-कश्मीरच्या काही भागांमध्ये बर्फवृष्टी झाली. काश्मीरच्या अनेक भागांत पुढच्या ४८ तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाची बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
लडाखमधल्या लेह इथं पारा उणे १६ पूर्णांक ४ अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरलं होतं. राजधानी दिल्लीतही पुढचे तीन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्याता आहे. पंजाब आणि हरयाणामध्ये पारा सातत्यानं सामान्य तापमानापेक्षा खाली उतरत असल्यानं थंडीची लाट कायम आहे. इथं अनेक भागांमध्ये दाट धुकं पसरलं आहे.
राजस्थानमध्येही थंडीची लाट कायम असून माउंट अबू या राज्यातल्या एकमेव थंड हवेच्या ठिकाणी काल रात्री पारा २ पूर्णंक ४ अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरला होता. राजस्थानात पुढच्या ४८ तासात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.