Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जेएनयू हिंसाचार प्रकरणी गृहमंत्रालयानं मागवला अहवाल, विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सायंकाळी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून, वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना चौकशीचे निर्देश दिले. गृह मंत्र्यांच्या कार्यालयानं सांगितलं की, संयुक्त पोलिस आयुक्तांच्या स्तरावरील अधिकार्‍यांमार्फत चौकशी केली जाईल. गृह व्यवहार मंत्रालयानं जेएनयूमधल्या स्थितीबाबत दिल्ली पोलिसांकडून अहवाल मागवला असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत.

जेएनयू कँपसमध्ये काल घडलेल्या हिंसक घटनांचा मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी निषेध केला आहे. हे दुर्दैवी असून अतिशय चिंताजनक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. कँपस क्षेत्रात विद्यार्थ्यांनी शांतता राखावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनीही जेएनयूमधला शिक्षक आणि विद्यार्थ्यांविरोधात करण्यात आलेला हिंसाचार अत्यंत निषेधार्ह असल्याचं म्हटलं आहे. एका ट्विटमध्ये, त्यांनी दिल्ली पोलिसांना जेएयू प्रशासनाच्या समन्वयानं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शक्य ती सर्व पावलं उचलण्याचे आणि हिंसाचार करणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

भाजपानं एका ट्विटमध्ये जेएनयू कँपसमध्ये झालेल्या हिंसाचाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जेएनयूमध्ये काल रात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटात संघर्ष झाला होता, त्यात १८ विद्यार्थी जखमी झाले होते. जखमींना एम्स रूग्णालयात दाखल केलं आहे.

Exit mobile version