Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अपयश कायम नसते, खचून जाऊ नका – संतोष पाटील

पिंपरी : नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांना अतिशय उत्तम प्रकारे शिक्षण देऊन घडवले जात आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी मिळणार आहेत. मुलांना मुलांसारखे वागू द्या, त्यांचा निरागसपणा हेरावून घेवू नका. अपयश आले, तरी खचून जाऊ नका. कारण ते कायमस्वरूपी नसते, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी व्यक्त केले.
पिंपरी–चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा  कार्यक्रम रामकृष्ण मोरे सभागृहात चिंचवड येथे अतिशय उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या वर्षी शाळेची ‘भारतीय दळण-वळण व्यवस्था’ अशी संकल्पना होती. विद्यार्थ्यांनी जुन्या काळापासून ते आधुनिक काळापर्यंत वापरण्यात आलेल्या विविध दळण – वळण साधनांशी संबंधित गाण्यावरती आपले नृत्याविष्कार सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल राय, निगडी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील टोणपे, नोव्हेल ग्रुप ऑफ़ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेविका अनुराधा गोरखे, संस्थेचे कार्यकारी संचालक विलास जेउरकर, शाळेच्या विश्वस्थ डॉ. प्रिया गोरखे, टेक्निकल हेड समीर जेउरकर आदी उपस्थित होते.
संतोष पाटील पुढे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे त्यांचे वार्षिक स्नेहसंमेलनाचा असतो. यावेळी आपण त्यांच्या कलागुणांच्या सादरीकरणासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी जमलेले असतो. याठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या शिस्तीवरून लक्षात येते की, शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांवर किती मेहनत घेतात. सर्व विद्यार्थ्यांमध्ये असलेला गुणवत्तापुर्ण शिक्षणाचा गुण त्यांना भविष्यात पुढे नेण्याचे काम करतो.
सुनील टोणपे साहेब म्हणाले की, मुलांना मुलांसारखेच वागू द्या, त्यांचे बालमन जपा, ते देशातील भावी नागरिक आहेत. त्यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना तसेच शाळेला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. अनिल रॉय म्हणाले की, नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल हे पिंपरी चिंचवड मधील इतर शाळांपेक्षा वेगळे आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची सांस्कृतिक, सामाजिक, तसेच शैक्षणिक वाढ अतिशय उत्तम प्रकारे होत आहे. मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की, ते फार नशीबवान आहेत, की तुम्हाला अतिशय उत्तम शाळेत शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे.
Exit mobile version