मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या विशेष निमंत्रितांच्या (तज्ज्ञ संचालक) नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्यासाठीची महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील यासंदर्भातील तरतूददेखील वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.
या अधिनियमानुसार 13 जून 2015 पासून तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्यांसाठी तरतूद करण्यात आली होती. ही तरतूद रद्द करण्याबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यास मान्यता देण्यात आली. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय लक्षात घेऊन आतापर्यंत केलेल्या नियुक्त्या प्रकरणपरत्वे रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यासदेखील मान्यता देण्यात आली.