मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द
मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांच्या सहाय्यतेसाठी ५१ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केंद्रीय राखीव पोलीस दलास – (सीआरपीएफ) सुपुर्द करण्यात आला. या निधीतून शहीद ४० जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाख २७ हजार पाचशे रुपयांची मदत करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते निधीचे धनादेश सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक संजय लाटकर, डेप्युटी कमांडर अनिमेष महिंद्रा यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
यावेळी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त भरत परीख, महेश मुदलीयार, आनंद राव, गोपाळ दळवी, संजय सावंत आदींसह न्यासाच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियांका छापवाले आदी उपस्थित होते.