Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महिलांनी आर्थिक सक्षमीकरणासाठी उद्योगांकडे वळावे – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

मुंबई : महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी माण प्रतिष्‍ठान करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उद्योग-व्यवसायांकडे वळणे गरजेचे आहे. या महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन विविध योजना राबवत असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

वरळी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमी येथे माण देशी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या उद्घाटक म्हणून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्‍हे बोलत होत्या.

ग्रामीण उद्योजक स्त्रियांचा हा महोत्सव असून, १२ जानेवारी २०२० पर्यंत नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सातारा जिल्ह्यातील माण गावातील महिलांना प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य देऊन उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य माण प्रतिष्ठान करीत असून, भविष्यातील त्यांच्या वाटचालीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे शासन प्रयत्न करेल.

शहरी आणि ग्रामीण भागातील स्त्रियांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन कार्यरत असून, त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी विविध योजना शासनामार्फत राबविल्या जातात. आर्थिक पाठबळ देऊन महिलांना उद्योजिका बनविण्यासाठी अर्थसहाय्यही करण्यात येते. ग्रामीण भागातील स्त्रियांबरोबर शहरातील स्त्रियांनीही मोठ्या संख्येने उद्योगाकडे वळावे, असे आवाहनही श्रीमती गोऱ्हे यांनी यावेळी केले.

माण महोत्सवात सहभागी महिलांना प्रतिष्ठानच्या बँकेतर्फे आर्थिक सहाय्य दिले जाते. शून्यातुन उद्योग निर्माण करण्याचे आणि त्यात सातत्य ठेवण्याचे कार्य उल्लेखनिय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रतिष्ठान आणि महिला संस्थांना शासकीय उद्योग धोरणामध्ये जमीन मिळण्यासाठी अंमलबजावणी लवकर करण्यात यावी यासाठी प्रयत्न करण्यात येईल. महिला सरपंच असलेल्या गावात महिला वाचनालयासाठी आर्थिक सहाय्य करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईत येऊन आपल्या उत्पादनांची विक्री करणे कठीण असून, ते कार्य या माणदेशी महिला करीत आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही श्रीमती गोऱ्हे यांनी यावेळी केले.

माण फाउंडेशन गेली चार वर्षे हा उद्योजिका महिलांसाठी हा महोत्सव आयोजित करीत आहे. तब्बल 100 महिलांचा या महोत्सवात समावेश आहे. यामध्ये खाद्य पदार्थांपासून, शेतीची उत्पादने, सेंद्रीय फळे आणि खाद्यपदार्थ, हस्त उत्पादने इत्यादी सर्व उत्पादने प्रदर्शन आणि विक्रीसाठी खुली आहेत.

उद्घाटनप्रसंगी माण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, डीओडब्ल्युचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर शेणॉय, एचएसबीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोशा, माणदेशी महिला बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी उपस्थित होते.

Exit mobile version