Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशातील विभिन्न संस्कृतीला एकत्रित ठेवणारी ‘हिंदी’ भाषा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : आपला देश विभिन्न संस्कृतीने नटलेला असून या सर्व संस्कृतीला एकत्र जोडण्यासाठी राष्ट्रभाषा हिंदीचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्यावतीने विश्व हिंदी दिवसानिमित्ताने आयोजित ९ व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात ते बोलत होते.

राज्यपाल म्हणाले, संस्कृत भाषा अनेक वर्ष राजभाषा काही ठिकाणी होती. कालांतराने भाषेतील काठिण्यामुळे संस्कृत भोषेचे प्रचलन कमी झाले. हिंदी भाषेचा वापरही व्यवहारात हळूहळू वाढत गेला आणि लोकांनीही हिंदी भाषा स्वीकारली. देशातील कोणत्याही भागात आज हिंदीचा झालेला प्रचार आणि प्रसार यात हिंदी चित्रपटाप्रमाणेच बॅंकेतील हिंदीतून होणाऱ्या व्यवहारांचेही योगदान आहे.

मराठी भाषा ही देवनागरी लिपित लिहिली जात असल्याने आपण राज्यपाल पदाची शपथ मराठीत वाचल्याचे राज्यपालांनी सांगितले. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी आपण आवर्जुन हिंदीतूनच संवाद साधत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी हिंदीतील योगदानासाठी डॉ.राजन नटराजन पिल्लई आणि श्रीमती शशी शुक्ला यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. देशभरातील दहा राजभाषा अधिकारी, आंतरबॅंक निबंध स्पर्धेचे विजेते आणि युवा विद्यार्थी सिद्धार्थ द्विवेदी, मोनाली गुप्ता आणि आदर्श मिश्रा यांनाही सन्मानित करण्यात आले. बॅंकेच्या राजभाषा विशेषांकासह इतर स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

Exit mobile version