बीएसईमध्ये ‘“सायबर सिक्युरिटी कॉन्फरन्स – २०२०”
मुंबई : राष्ट्रीय वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी ‘सायबर सुरक्षा’ हा आता महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच भांडवली बाजार आणि सामान्यांच्या गुंतवणूकीचे संरक्षण व्हावे यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ ‘सेबी’चे सदस्य एस. के. मोहंती यांनी केले.
सेबी, बाँम्बे स्टाँक एक्स्चेंज ‘बीएसई आणि महाराष्ट्र सायबर यांच्या वतीने ‘सायबर सिक्युरिटी कान्फरन्स – २०२०’ परिषदेचे आयोजन स्टॉक एक्सचेंज येथे करण्यात आले. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. मोहंती प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
बीएसईच्या सभागृहात आयोजित या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र सायबरचे प्रमुख तथा विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह, डिजिटल सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या – डिएससीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रमा वेदश्री, एनसीआयआयपीसीचे महासंचालक अजित वाजपेयी, ‘सर्ट-इन’चे महासंचालक संजय बहल यांची बीजभाषणे झाली.
प्रमुख पाहुणे श्री. मोहंती म्हणाले, “भारतीय वित्तीय क्षेत्रातील नियामक संस्थांसह आणि विविध घटकांच्या हितरक्षणासाठी कार्यरत असे महाराष्ट्र सायबर यांनी संयुक्तपणे आय़ोजित केलेली ही परिषद महत्त्वपूर्ण अशीच आहे. वित्तीय संरचना आणि गुंतवणूक क्षेत्राच्या दृष्टीने सुरक्षेचे अनेकविध प्रय़त्न केले जात आहेत. सायबर हल्ल्यांपासून आणि विघातक शक्तींच्या हस्तक्षेपापासून भांडवली बाजार आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात विविध घटकांनी एकास्तरावर एकत्र येऊन माहितीचे आदान-प्रदान करणे आवश्यक आहे.
सायबर हल्ल्यात गुंतलेल्या शक्तींपासून कुणीही सुरक्षित नाही. त्यामुळे ज्यांना अशा हल्ल्यांचा अनुभव आहे, अभ्यास आहे अशांनी ही माहिती स्वतःपुरती मर्यादीत ठेवता कामा नये. सायबर हल्ल्यांना परतावून लावणारी परिपूर्ण अशी प्रणाली अस्तित्वात नाही. तुम्ही तुमची प्रणाली जितकी अद्ययावत करत आहात, त्याहून अधिक प्रभावी प्रणाली विघातक शक्ती विकसित करण्यात पुढे राहू शकतात. त्यामुळे सर्व शक्यता गृहीत धरून, परस्पर सहकार्यातून भांडवली बाजार आणि सामान्यातील सामान्य गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी सदैव सतर्क रहाणे आणि प्रय़त्न करणे आवश्यक आहे.”
यावेळी श्री. मोहंती यांनी सेबीतर्फे सायबर सिक्युरिटी इंडेक्स अंतर्गत भांडवली बाजाराशी निगडीत डिपॉझीटरी, ब्रोकर्स, क्लिअरिंग हाऊसेस यांना सायबर सुरक्षेसाठीचे उपाय योजनांबाबत प्रोत्साहन दिले जात असल्याची माहिती दिली.
महाराष्ट्रात ‘सायबर साक्षरते‘साठी विशेष प्रयत्न
महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले, “सायबर सुरक्षा हा आता काळाची गरज असा विषय आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कित्येक शतकांपुर्वी आपण खैबर खिंडीतून परकीयांना प्रवेश देण्याची चूक केली होती. पण आता सायबर सुरक्षा हा सीमाकिंत विषय राहिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आणखी सतर्क आणि सज्ज व्हावे लागेल. विघातक शक्ती आपल्याकडे अस्तित्त्वात असलेल्या अद्ययावत सुरक्षा प्रणालींच्या पुढे जाऊन तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे व्यापक दृष्टीने आणि विविध घटकांनी एकत्र येऊन सर्वंकष असे प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी ‘सायबर सिक्युरिटी क्रायसीस मॅनेजमेंट’च्या उपाययोजना कराव्या लागतील. विघातक शक्तींचे हल्ले परतवण्यासाठी सुत्रबद्ध प्रयत्न करावे लागतील. यासाठी विविध घटकांपर्यत सायबर साक्षरता विषय पोहचविण्याची गरज आहे.”
‘महाराष्ट्र सायबर’ने नव्या वर्षात जानेवारीतच सुमारे दीडशे ‘सायबर सेफ वुमेन’ कार्यशाळा घेऊन, त्याद्वारे सुमारे चाळीस हजार महिला आणि मुलींपर्यंत ‘सायबर सुरक्षा’ हा विषय पोहचविल्याची माहिती श्री. सिंह यांनी दिली.
सायबर सुरक्षा क्षेत्रात गुंतवणूक
डिएससीआयच्या श्रीमती वेदश्री म्हणाल्या, “गुंतवणूक आणि वित्तीय क्षेत्रातील नियामक तसेच सुरक्षा क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र सायबर यांनी अशी परिषद आयोजित करणे हा अभिनव प्रयत्न आहे. भारत हा डिजिटल ईकनॉमी आणि एक अर्थसत्ता म्हणून विकसित होणारा देश आहे. यामुळे आपल्या वित्तीय सेवा क्षेत्र, भांडवली बाजार आणि फिनटेक उद्योग या क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत. युपीआयमुळे डिजिटल पेमेंट प्रणालीच्या वापर वाढतो आहे. अशा बदलाच्या काळातच जोखीम वाढते. त्यामुळे आपल्या आर्थिक पायाला धक्का पोहचविण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळेच नियामक अशा यंत्रणांनी एकत्र येऊन सायबर सुरक्षेबाबत जागृती करणे आवश्यक ठरते. फायनान्शील डाटा त्यातही वैयक्तिक वित्तीय माहिती ही आता डाटा प्रोटेक्शन विधेयकाद्वारे संवेदनशील ठरविली जाते आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा क्षेत्रात गुंतवणूक करणे, कौशल्य वृद्धी करणे आवश्यक आहे.”
एनसीआयआयपीसीचे महासंचालक श्री. वाजपेयी म्हणाले, “सायबर हल्ल्यांच्या दृष्टीने संवेदनशील अशा सहापैकी सर्वात संवेदनशील असे वित्तीय क्षेत्र आहे. कित्येकदा अनेक सायबर हल्ले आणि विघातक शक्तींचे प्रयत्न उधळून लावल्याचे दाखले दिले जातात. पण यातीलच एखादा हल्ला मोठा परिणामकारक ठरू शकतो. धोकादायक सिद्ध होऊ शकतो, हे लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळेच भांडवली बाजार आणि वित्तीय संरचनेत विकसित होणाऱ्या प्रणाली या सायबर सुरक्षा मानकांची अंमलबजावणी करणाऱ्या असाव्यात असे प्रय़त्न आहेत. वित्तीय संरचनेतील कोणते घटक हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने प्रणाली विकसित कऱणे ही सामूहिक जबाबदारी समजावी लागेल.”
सर्ट-ईनचे महासंचालक श्री. बहल म्हणाले, “भांडवली बाजारातील गुंतवणूकदार, विविध कंपन्या आणि बाजाराशी निगडीत विविध घटक यांचा विश्वास दृढ रहावा यासाठी सायबर सुरक्षा हा महत्त्वपूर्ण विषय आहे. भांडवली बाजाराच्या सुरक्षेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सुरक्षेतील कच्चे दुवे शोधण्याची प्रक्रिया आणि प्रयत्न सातत्याने करावे लागतील. यात संरचनेतील एखाद-दुसऱ्या घटकाची जबाबदारी नसून, अनेकांनी एका समानस्तरावर येऊन धोरण आखावे लागेल. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील परस्पर संबंध आणखी दृढ करावे लागतील. समन्वय, संवाद वाढवावा लागेल. वित्तीय संरचनेतील बँकांपासून विविध घटकांचा सक्रिय सहभागाला प्रोत्साहन द्यावे लागेल.” याच प्रयत्नाचा भाग म्हणून जागतिक स्तरावरील एकशेऐंशी देशाच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या उपक्रमात सर्ट-इननेही सहभाग नोंदविल्याचे श्री. बहल यांनी सांगितले.
सुरवातीला बीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी स्वागत केले. शिवकुमार पांडे यांनी आभार मानले. उद्घाटनानंतर परिषदेत दिवसभरात विविध सत्रांमध्ये ‘सायबर सुरक्षा’ आणि वित्तीय क्षेत्रातील विविध बाबींशी निगडीत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मांडणी केली.
यापरिषदेस भांडवली बाजार आणि गुंतवणूक क्षेत्राशी निगडीत तसेच सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ, महाराष्ट्र सायबरचे वरीष्ठ पोलीस अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.