नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जनगणनेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून, ही जनगणना येत्या, एक एप्रिल पासून सुरु होईल आणि ३० सप्टेंबर पर्यंत चालेल.
या जनगणनेदरम्यान, जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन सूची तयार करण्याच्या दृष्टीनं, कुटुंबप्रमुखाचा भ्रमणध्वनी क्रमांक, शौचालय, दूरचित्रवाणी, इंटरनेट, वाहन त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचा स्रोत यासह अन्य माहिती संकलित करतील.
जणगणनेदरम्यान प्रत्येक कुटुंबाच्या माहितीची यादी तयार करण्यासाठी एकूण ३१ प्रश्न विचारण्याचे निर्देश महानोंदणी आणि जनगणना आयुक्तांनी जनगणना अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कुटुंबप्रमुखाचा भ्रमणध्वनी क्रमांक केवळ जनगणनेसाठी माहिती मिळवण्याच्या दृष्टीनं संवाद साधण्यापुरताच मागितला जाईल, भ्रमणध्वनी क्रमांक मागण्याचा अन्य कोणताही उद्देश नाही, असं या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे.
टेलिफोन, स्मार्टफोन, सायकल, दुचाकी, रेडिओ, लॅंपटॉप, विजेचा स्रोत, स्वयंपाकाचा गॅस यांसारख्या गोष्टीची माहिती कुटुंबप्रमुखाकडून मागवण्यात येणार आहे. ही जनगणना एका मोबाईल अँप द्वारे केली जाणार आहे.