मालदिवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह तसेच श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरिसेना यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करत मी येत्या 8 आणि 9 जून रोजी मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर जात आहे. पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आल्यानंतर हा माझा पहिलाच परदेश दौरा आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मला पंतप्रधान सोलिह यांचे भारतात स्वागत करण्याची संधी मिळाली होती. तसेच, मालदीव येथे नोव्हेंबर 2018 साली राष्ट्राध्यक्ष सोलिह यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्याची संधी देखील मला मिळाली होती. मालदीवला मी देणार असलेली भेट हे दोन्ही सागरी शेजारी आणि दीर्घकाळापासूनच्या मित्र देशांच्या संबंधाचे प्रतिबिंबच म्हणायला हवे.
मालदीव हा आमचा महत्वाचा भागीदार असून या देशासोबत भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृढ व प्राचीन बंध आहेत. गेल्या काही वर्षात भारताचे मालदीवशी असलेले द्वीपक्षीय संबंध अधिकच मजबूत झाले आहेत. माझ्या ह्या मालदीव भेटीमुळे दोन्ही देशातील बहुआयामी संबंध अधिक घट्ट होतील, असा मला विश्वास आहे.
श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी म्हणजे, 21 एप्रिल 2019 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्यानंतर श्रीलंकेतील सरकार आणि तेथील जनतेच्या सोबत भारत भक्कमपणे उभा आहे, हा संदेश देण्यासाठी मी श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. श्रीलंकेच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत सदैव त्याच्यासोबत असेल.
गेल्या काही वर्षांत भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या द्वीपक्षीय संबंधाना मोठी गती मिळाली आहे. नव्या सरकारच्या शपथविधीसाठी भारत दौऱ्यावर आलेले श्रीलंकेचे राष्ट्रपती सिरिसेना यांची भेटण्याची संधी मला मिळाली. माझ्या दौऱ्यादरम्यान श्रीलंकेतील शीर्षस्थ नेत्यांची भेट होईल, अशी मला अपेक्षा आहे.
माझ्या मालदीव आणि श्रीलंका भेटीमुळे ह्या दोन्ही सागरी मित्रराष्ट्रांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील, असा मला विश्वास आहे. भारताच्या ‘शेजारी प्रथम’ ह्या धोरणाला अनुसरुन तसेच ह्या प्रदेशातील सर्वांची सुरक्षा आणि समृद्धीसाठीच्या आमच्या धोरणानुसारच माझा हा दौरा असणार आहे.