पिंपरी : पावसाळ्यात कोणतीही समस्या यायला नको, ठरवून दिलेल्या मुदतीत नालेसफाई झाली पाहिजे, असे आदेश वरिष्ठांनी दिले. परंतु हे आदेश कागदावरच राहिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामांचे चोख नियोजन करण्यात येत. मात्र हे नियोजन कागदावरच राहते हे पुन्हा एका सिद्ध झाले आहे. मे महिन्यात आढावा बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये नालेसफाईचे काम करण्यासाठी 15 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती.
मात्र, 15 मे तारीख उलटल्यानंतरही अनेक भागात नालेसफाईच्या कामाला सुरवातही झाली नव्हती. नुकतीच पावसाने हजेरीही लावली मात्र अनेक ठिकाणच्या नालेसफाईला सुरुवातही झाली नसल्याचे समोर आले आहे. कासारवाडी, यमुनानगर, तसेच निगडी, चिंचवड परिसरातील अनेक भागामध्ये नालेसफाईची कामे अपुर्ण आहेत. याबाबत तात्काळ उपायोजना न केल्यास पावसाळ्यात नाले तुंबण्याच्या भितीमुळे अनेक अडचणीला समोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात लहान-मोठे स्वरुपात जवळपास 200 हून अधिक नाले आहेत. यातील अनेक नाल्याची सफाई होणे बाकी असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अद्याप जोरदार पावसास सुरुवात झालेली नसल्याने अपूर्ण कामे तात्काळ मार्गी लागावीत, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.