पुणे : रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होणे गरजेचे असून वाहतुकीचे नियम पाळून पुणेकरांनी राज्यासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन खासदार तथा संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय, परिवहन विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 31 व्या राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचा सांगता समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झाला, यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, वाहतूक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस अधीक्षक संदिप पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दुचाकी रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गक्रमण करण्यात आले. यावेळी राज्य परिवहन महामंडळातील उत्कृष्ट महिला वाहन चालक व रस्ता सुरक्षा अभियात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, सध्याचे युग गतिमान असले तरीही वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम पाळून वाहन सुरक्षितपणे व नियंत्रित वेगात चालवायला हवे. रस्त्यावर अपघात झाल्यावर जखमींना वेळेत मदत व उपचार न झाल्यामुळे आजवर अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी समाजाने संवेदनशीलता व माणूसकी जपायला हवी. रस्त्यावर अपघातात जखमी झाल्याचे दिसून आल्यास प्रत्येकाने विनाविलंब अपघातग्रस्तांना मदत मिळवून देणे गरजेचे आहे.
खासदार सुळे म्हणाल्या, हे शहर आपले असून शहराची संस्कृती जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. वाहतुकीचे नियम स्वत: च्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी असून वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन अपघाताचे प्रमाण शुन्य टक्के होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यातील पोलीस आपले कर्तव्य अविरत बजावत असल्याचे दिसून येते. वाहतूक शिस्तीचे नियम पोलीसांनी दाखवल्यास त्यांच्याशी आदराने व नम्रपणे संवाद साधून पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन करुन रस्ता सुरक्षा व पोलीसांप्रती आदरभावाचे धडे व संस्कार शाळांमधून द्यायला हवेत, असे त्यांनी सांगितले.