लोकनेते राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या वतीने उभारलेल्या दूध भुकटी प्रकल्पाचे आणि राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत उभारलेल्या पशुखाद्य प्रयोगशाळेचे उद्घाटन
सांगली : पशुधन हे शेतकऱ्यांचे कुटुंब असून, पशुधनाच्या आरोग्यासाठी राज्यात लवकरच फिरते पशु चिकित्सालय सुरु केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
लोकनेते राजारामबापू यांचे ३६ वे पुण्यस्मरण व जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या वतीने २४ कोटी ४० लाख रूपये खर्चून उभारलेल्या दूध भुकटी प्रकल्पाचे आणि राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत उभारलेल्या पशुखाद्य प्रयोग शाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती व तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई, सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबूले आदी मान्यवर उपस्थित होते.
पशुधनाची जोपासना करणे सर्वार्थाने महत्त्वाचे असून त्यांना पोषक पशुखाद्य, औषधोपचार, चारा आदी गोष्टी वेळीच उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, फिरत्या पशु चिकित्सालय उपक्रमाच्या यशस्वितेनंतर राज्यात विभागनिहाय पशु चिकित्सालये सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांसाठी जे – जे करणे शक्य आहे, ते करण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध राहील, अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, हे सरकार कोणताही सूड उगवणारे नसून, जे चांगले आहे, ते टिकवणं, वाढवणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कारभार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील शेतकरी मेहनती व कष्टाळू असून तो ऊन, वारा व पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र शेतात राबतो आहे. अशा माझ्या शेतकऱ्याला सहाय्य करण्याची संधी मला मिळाली असून ती निश्चितपणे पूर्ण करण्याचा निर्धार मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी केला.
राज्यातील सहकार क्षेत्र अजिबात मरु देणार नाही, अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, गोरगरीब शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी सहकाराच्या माध्यमातून काम केले पाहिजे, असे अभिवचन मी सहकारात काम करणाऱ्यांकडून मागतो आहे. हे निश्चितपणे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकनेते राजारामबापू पाटील हे एक विद्यापीठच होते, अशा शब्दात बापूंच्या कार्याचा गौरव करुन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक परिवर्तनास चालना दिली. त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी नवनवे प्रयोग करुन शेतकऱ्यांना विकासाची नवी दालने उपलब्ध करुन दिली. बापूंच्या विचार आणि कार्याची परंपरा जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि त्यांचे कुटुंबीय यशस्वीपणे जोपासत आहेत. याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. राजारामबापू दूध संघ हा एक अद्ययावत व आदर्श दूध संघ असून अद्ययावत मशनरी, स्वच्छता या गोष्टींचीही उत्कृष्टपणे जोपासना केली असल्याचा गौरवही त्यांनी केला.
या प्रसंगी बोलताना जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, राजारामबापू सहकार व उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो हातांना काम मिळाले असून त्यामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शासनही शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि विकासासाठी कटिबध्द आहे.
प्रारंभी राजारामबापू दूध संघाचे चेअरमन विनायकराव पाटील यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात दूध संघाच्या प्रगतीचा आणि कार्याचा आढावा घेतला. शेवटी व्हाईस चेअरमन जगन्नाथ पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, दूधसंघाचे संचालक, राज्यातील दूध वितरक आणि दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.