नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ज्ञात असलेले बापू नाडकर्णी यांनी १९१ प्रथम श्रेणी सामन्यात ५०० गडी बाद करत ८ हजार ८८० धावाही केल्या होत्या. सलग २१ निर्धाव षटकं टाकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. नाडकर्णी यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते.
बापूंच्या निधनानं एक ज्येष्ठ आणि भारतीय क्रिकेट विश्वातला जुनाजाणता क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारतीय क्रिकेटच्या सुवर्णयुगातला अष्टपैलू क्रिकेटपटू क्रिकेट जगतानं गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नाडकर्णी यांच्या निधनानं क्रिकेटमधल्या जादुई गोलंदाजीचं पर्व संपलं, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर, बापू नाडकर्णी यांच्यासारख्या क्रिकेटपटूमुळे क्रिकेट हा खेळ जागतिक पटलावर पोहोचल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.