Site icon साप्ताहिक एकच ध्येय

तणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री

मुंबई : देशात तणावपूर्ण वातावरण असताना पोलिसांनी चोख कामगिरी बजावत मुंबईतील शांतता अबाधित राखली आहे. त्यांच्या कार्यास आंदोलकांनीही धन्यवाद दिले असल्याचे सांगून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या कार्यास मानाचा मुजरा केला.

मुंबई पोलिसांसाठी आयोजित ‘उमंग 2020’ या कार्यक्रमाचे बांद्रा रेक्लमनेशन येथील वर्ल्ड जिओ सेंटर या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पोलिसांचे आयुष्य खडतर आहे. त्यांनाही भावना आणि कुटुंब आहे. मात्र जनतेच्या सुरक्षेसाठी ते नेहमी तत्पर राहून शहर सुरक्षित ठेवतात.

आज आम्ही सुरक्षित आहोत ते फक्त पोलिसांमुळे असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी पोलिसांच्या हिंमत व शौर्याचे कौतुक केले.

मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याचे सांगून पोलीस आयुक्त श्री. बर्वे यांनी पुढील वाटचालीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

पोलिसांची कामगिरी छायाचित्र रूपात दर्शवणाऱ्या 2020 च्या कॅलेंडरचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

बॉलिवूडचे सिने अभिनेते, मोठ्या संख्येने पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात सिनेमातील तारे-तारकांनी कलेचे सादरीकरण केले.

कार्यक्रमास गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई,  कायदा व सुव्यवस्था सह आयुक्त विनय चौगले, आर्थिक गुन्हे शाखेचे सह आयुक्त राजवर्धन, गुन्हे शाखेचे सह आयुक्त संतोष रस्तोगी, प्रशासन चे  सह आयुक्त नवल बजाज,  श्रीमती रश्मी ठाकरे आदींसह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version