Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘ओबीसी’ दिव्यांग तसेच विधवा यांना हक्काचे घर देणार – मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई : ‘ओबीसी’मधील दिव्यांग तसेच विधवा यांना हक्काचे घर देण्यासाठी रमाबाई आंबेडकर घरकुल योजनेच्या धर्तीवर नवीन योजना तयार करावी, असे निर्देश इतर मागासवर्गमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. इतर मागासवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली.

ओबीसी समाजातील  दिव्यांग व विधवा यांना अजूनही ग्रामीण भागात हक्काचे घर नाही. तसेच अनाथांचीही हीच अवस्था असून यांच्यासाठी शासन  लवकरच घरांची निर्मिती करण्याची योजना तयार करणार आहे. यासाठी ज्या व्यक्तीला लाभ घ्यायचा आहे. त्या व्यक्तीचे उत्पन्न एक लाखाच्या आत असणे गरजेचे असून यापूर्वी घरासंबंधित असलेल्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही. अशाच व्यक्तींना या योजनेच्या लाभ घेता येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यासाठी साधारणत: पाच हजार घरांसाठी आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.  तसेच ही योजना  ओबीसी विभागामार्फत तयार केली जाणार असून याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करावी असेही आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू, प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, सहसचिव भा.र. गावीत, उपसचिव रविंद्र गुरव तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version