मुंबई (वृत्तसंस्था) : तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान सिंह राठोड यांच्यात झालेल्या लढाईस महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सदर लढाईवरील “तान्हाजी – द अनसंग वॉरिअर” या चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या चित्रपटासाठी चित्रपटगृहांनी तिकिट दरावर लागू असलेला राज्य वस्तू व सेवा कर (एसजीएसटी) प्रेक्षकांकडून वसूल न करता चित्रपटगृहाने स्वत: राज्य शासनाच्या तिजोरीत भरण्याचा निर्णय झाला. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून 30 एप्रिल 2020 पर्यंतच्या कालावधीतील तिकीट विक्रीवरील राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा देण्यास मान्यता देण्यात आली.