मुंबई : मुंबई शहरात सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी 16 हजार घरे उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री. मुंडे बोलत होते.
श्री. मुंडे म्हणाले, राज्यातील सफाई कामगारांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी त्वरित कार्यवाही सुरु आहे. तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सर्व सफाई कामगारांना लाभ देण्याबाबतचा मुख्यमंत्री महोदयांबरोबर लवकरच बैठक घेण्यात येईल.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी, सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.