नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखाती क्षेत्राचं मुख्यद्वार असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत संघर्ष टाळण्यासाठी नौदल गस्ती नौकेला युरोपीय संघातल्या आठ देशांनी राजकीय पाठिंबा दिल्याची माहिती फ्रान्सनं काल दिली. फ्रान्स, जर्मनी, इटली, बेल्जीयम, डेन्मार्क, पोर्तुगाल आणि नेदरलँड अशी ही आठ राष्ट्र आहेत.
या मिशनचं मुख्यालय अबूधाबी इथं असणार आहे. डचची युद्धनौका पुढच्या महिन्याच्या शेवटी या भागात पाठवली जाणार आहे. इराण आणि अमेरिकेदरम्यान वाढलेल्या संघर्षामुळे या भागात तणाव वाढला आहे, म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं फ्रान्सच्या लष्करी अधिकाऱ्यानं सांगीतलं.
या भागात तेलवाहू नौकांवर सतत हल्ले होत आहेत, म्हणूनही हा निर्णय घेतल्याचं या अधिकाऱ्यानं सांगतलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीची रुंदी केवळ ५० किलोमीटर असून खोली ६० मीटर असल्यानं ही सामुद्रीधुनी असुरक्षित आहे. म्हणून इथं गस्ती नौका गरजेची आहे, असंही हा अधिकारी म्हणाला.