मुंबई : दुर्लक्षित आणि ग्रामीण भागातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या खेळांचा राज्यात आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश करणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरणाचे नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत श्री. केदार बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, आमदार रोहित पवार, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया आदी उपस्थित होते.
श्री.केदार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवछत्रपती पुरस्कार प्रदान सोहळा गेटवे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या, खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या युवक खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्या खेळाडूंचा शिवछत्रपती पुरस्कार वितरणाच्या दिवशी म्हणजे शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी त्यांचाही गौरव करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.