पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मागण्या अर्थमंत्र्यांनी केल्या मान्य
मुंबई : मुंबई शहराचा सन 2020-21 चा जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेसाठीच्या 104 कोटींच्या निधीची मर्यादा 35 कोटी रुपयाने वाढविण्याची मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलेली मागणी अर्थमंत्री अजित पवार यांनी मान्य केली असून आता शहरासाठी सर्वसाधारण योजनेसाठी 140 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. तसेच मुंबईतील उपकर प्राप्त इमारतीच्या दुरुस्तीतील एका इमारतीसाठी एकदाच खर्च करण्याची अट शिथिल करण्याची श्री. शेख यांची मागणीही अर्थमंत्र्यांनी मान्य केली आहे.
कोकण विभागातील जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनेची (सर्वसाधरण) राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी पालकमंत्री श्री. शेख यांनी केलेल्या दोन्ही मागण्या अर्थमंत्र्यांनी मान्य केल्या.
मुंबई शहर जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेसाठीची मर्यादा 104 कोटी इतकी देण्यात आली होती. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी व जागतिक पर्यटन केंद्र आहे. येथील पर्यटन वाढविण्यासाठी ऐतिहासिक वास्तूंची सौंदर्यवृद्धी, शहरात हेरिटेज वॉक, महिलांसाठी स्वच्छतागृहे आदी विविध सुविधा निर्माण करावे लागणार आहेत. त्यासाठी सर्वसाधारण योजनेतील निधीची मर्यादा अत्यल्प पडते. त्यामुळे ही मर्यादा वाढवून देण्याची आग्रही मागणी पालकमंत्री श्री. शेख यांनी अर्थमंत्र्यांकडे आजच्या बैठकीत केली. श्री. शेख यांची ही मागणी अर्थमंत्र्यांनी मान्य करून सर्वसाधारण योजनेत 35 कोटी वाढवून दिले. यामुळे मुंबई शहर जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी आता 140 कोटी रुपये मिळणार आहेत.
उपकर प्राप्त इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधीसंदर्भातील अट शिथिल
मुंबई शहरामधील उपकर प्राप्त इमारतीच्या दुरुस्ती कामासाठी आमदार/खासदार निधीतून एका इमारतीसाठी 15 लाख रुपयांच्या मर्यादेत एकदाच निधी वितरित करण्याची अट गृहनिर्माण विभागाने टाकली होती. ही अट शिथिल करावी, अशी मागणी बैठकीत मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी अर्थमंत्र्यांकडे केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन ही अट शिथिल करण्यास अर्थमंत्री श्री. पवार यांनी मान्यता दिली आहे. यामुळे एका इमारतीसाठी खर्चाच्या मर्यादेत कितीही वेळा खासदार/आमदार निधी वितरित करता येईल.
मुंबई शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्वसाधारण योजनेसाठी वाढीव निधी दिल्याबद्दल तसेच उपकर प्राप्त इमारतीच्या दुरुस्तीसंबंधीची अट शिथिल केल्याबद्दल पालकमंत्री अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.