पिंपरी चिंचवड मनपाने उभे केले कार्बन डाय ऑक्सआईड पार्क !!
पिंपरी : शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या बेसुमार वाहनांमुळे निर्माण होणारा कार्बन डाय ऑक्सआईड वायु व पिपरी चिंचवड एम.आय.डी.सी मधील कारखान्यांमध्ये निर्माण होणारे विविध विषारी वायू हे वातावरणात मिसळल्यामुळे शहरवासीयांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहून त्यांचे जगणे सुसह्य व्हावे, शिवाय शहरातील वाहन व कारखान्यांमुळे निर्माण होणारा कार्बन डाय ऑक्सआईड वायू कमी व्हावा आणि जास्तीतजास्त व मुबलक ऑक्सीजन निर्माण व्हावा या उदात्त हेतूने महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्चून विविध भागात जवळपास ६५ लहान-मोठी उद्याने उभारली आहेत. यापैकी एक म्हणजे चिंचवडच्या लक्ष्मी नगर भागात स्वामी समर्थ हौसिंग सोसायटीसमोरील, पिंपरी चिंचवड मनपा स्व. मुरलीधर गावडे उद्यान (ऑक्सिजन पार्क). जवळपास 2 एकर जागेत विकसित केलेल्या या उद्यानात अनेकविध वृक्षांबरोबर विविध औषधी वनस्पती आणि असंख्य फुलांची झाडे लावली आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण व्हावा, मॉर्निंग आणि इव्हनिंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना मुबलक ऑक्सिजन मिळावा हाच यामागील हेतू आहे.
रविवार दिनांक 19/1/2020 रोजी जागृत नासगरिक महासंघाने सकाळी मॉर्निंग वॉक करता करता या ऑक्सिजन पार्कला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संपूर्ण उद्यानात धुराचे साम्राज्य पसरलेले होते, त्यामुळे आम्ही संभ्रमात पडलो की, मनपाने ऑक्सिजन पार्क उभे केले की कार्बन डाय ऑक्सआईड पार्क!! त्यानंतर थोडी चौकशी केली असता असे समजले की, उद्यानाची देखभाल करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी पाला पाचोळा काट्या कुट्या जाळून/ पेटवून धूर केला आहे. तोच धूर संपूर्ण उद्यानात पसरलेला आहे. यानंतर आम्ही वॉकिंग ट्रॅकवरून संपूर्ण उद्यानाची पाहणी केली असता, अनेक ठिकाणी वाळलेल्या गवताचे ढिगच्या ढिग दिसून आले. उद्यानाच्या संरक्षक भिंतीबाहेर असलेल्या नाल्याजवळील लोखंडी दरवाजा सताड उघडा आढळला, यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांची लहान मुले नजर चुकवून या दरवाजातून बाहेर गेली तर, अतिशय गंभीर घटना घडू शकते. शिवाय उद्यानात सर्वत्र गवताचे साम्राज्य दिसून आले म्हणजे फुले कमी आणि तन जास्त.
एकंदरीत या उद्यानाच्या देखरेखीवर लाखो रुपये खर्च करूनही उद्यान विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ऑक्सिजन पार्कचे कार्बन डाय ऑक्सआईड पार्क झाले आहे. आपण या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन संबंधित देखभाल ठेकेदारावर कडक कारवाई करावी आणि आपल्या जबाबदारी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित उद्यान सुपरवायझर आणि अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी जागृत नागरिक महासंघाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रवण हार्डिकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.