नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज ७१ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि संचलनाची सलामी स्वीकारली. ब्राझिलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे मुख्य अतिथी होते.
या समारंभाला उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह, नितिन गडकरी, निर्मला सीतारामन यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग हे सुद्धा उपस्थित होते. तत्पूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहीद जवानांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात केली.
२१ तोफांच्या सलामीसह राष्ट्रगीत झाल्यानंतर संचलनाला सुरुवात झाली यात परमवीर चक्र, आणि अशोक चक्र विजेत्यांसह विविध सुरक्षा दलांनी केलेल्या संचलन आणि सहा केंद्रीय मंत्रालये तसंच सोळा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांचा समावेश होता. देशाची सैनिकी श्रेष्ठता, सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक, आर्थिक संपन्नता यांचं दर्शन या चित्ररथांतून उपस्थितांना झालं. यावेळी प्रथमच सीआरपीएफच्या महिला दुचाकी स्वारांच्या ताफ्यांनं चित्तथरारक कसरती केल्या. जम्मू-कश्मीर यावर्षी केंद्रशासित प्रदेश म्हणून संचलनात सहभागी झाला.
ध्वजारोहण आणि दिमाखदार संचलन ही आजच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची मुख्य वैशिष्ट राहीली. जम्मूत कडक सुरक्षा व्यवस्थेत मुख्य प्रजासत्ताक दिन सोहळा जम्मूच्या मौलना आझाद स्टेडियम इथं आज आयोजित केला होता. नायब राज्यपाल जी सी मुर्मू यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
हिमाचल प्रदेशात कडाक्याच्या थंडीतही प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, मध्य प्रदेश, त्रिपुरा, छत्तीसगड, नागालँड, सिक्कीम, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि गुजरात या राज्यांमधे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्रातही सर्व जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते, तर मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
भारतीय प्रजासत्ताक दिन नेपाळमधे मोठ्या उत्साहात साजरा झाला. पश्चिम आशियाई देशांमधेही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाल्याचं आमच्या दुबईच्या वार्ताहरानं कळवलं आहे. श्रीलंकेतल्या भारतीयांनीही ७१वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.