Site icon साप्ताहिक एकच ध्येय

चीनमधे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येमध्ये वाढ.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणू संक्रमणामुळे आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २ हजार ६४ लोक बाधित झाले आहेत. या विषाणूचा प्रसार वाढतच असल्याचं चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांनी काल एका विशेष बैठकीनंतर सांगितलं. चीन गंभीर परिस्थितीचा सामना करत असून, ३० प्रांतामधे उच्च पातळीवरची आपात्कालीन स्थिती जाहीर केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हाँगकाँगच्या विशेष प्रशासनिक क्षेत्रानंही आपात्कालीन स्थिती जाहीर केली आहे. चीननं देशाबाहेर पर्यटन तसंच वन्य प्राण्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे. अनेक देशामधून या कोरोना संक्रमणाचे रुग्ण आढळत असल्यानं जगभरातले स्वास्थ्य अधिकारी संक्रमण थोपवण्याचे उपाय योजत आहेत. युरोप, उत्तर अमेरिका आणि काही आशियाई देशांमधे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. वूहान प्रांतातल्या भारतीयांच्या सुरक्षेसंदर्भात बिजिंगमधला भारतीय दूतावास चीनी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं चीनसाठी ही आपातस्थिती असल्याचं म्हटलं आहे. चीनमधे औषधांची पूर्तता करण्यासाठी सरकार औषधं आयात करत आहे. चीनमधल्या झीयान शहरातून जाणा-या लांब पल्ल्याच्या प्रवासी बस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. तियांजिन आणि बिजिंग शहरात ही बंदी पूर्वीच लागू झाली आहे.

दरम्यान, भारतात केंद्रसरकारनं कोरोना विषाणू संदर्भात माहिती देण्यासाइ चोवीस तास काम करणारी हेल्पलाईन सुरु केली असून, ९१-११- २३९७८०४६ या क्रमांकावरुन ही माहिती मिळवता येईल. ही हेल्पलाईन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या सूचनेवरुन सुरु केली आहे.

Exit mobile version