नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रस्तावित गगनयान मोहीम ही 21 व्या शतकात भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधताना ते म्हणाले, की मोहीम नव्या भारतासाठी मैलाचा दगड ठरेल. या मोहिमेच्या माध्यमातून 2022 मधे स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना भारतीयांना अंतराळात पाठवण्याचा संकल्प पूर्ण करायचा आहे. या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलाच्या चार वैमानिकांची निवड करण्यात आली असून, त्यांना रशियामधे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तिथं एक वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते देशाच्या आशा-आकांक्षांची जबाबदारी उचलत अवकाशात झेप घेतील, असं ते म्हणाले. हे उदयोन्मुख तरुण भारताच्या कौशल्य, प्रतिभा, क्षमता, धैर्य आणि स्वप्नांचं प्रतिक आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.
हिंसेनं कोणतीही समस्या सुटत नाही, तर त्यावर तोडगा काढणं, हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. हिंसेच्या माध्यमातून अजूनही पर्याय शोधणा-यांना प्रधानमंत्र्यांनी मुख्य प्रवाहात सामिल व्हायचं आवाहन केलं आहे. आसाममधे काही दिवसांपूर्वी 644 दहशतवाद्यांनी शांततेवर विश्वास ठेवून शरणागती पत्करल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्यावर्षी त्रिपुरात 80 जणांनी हिंसेचा मार्ग सोडल्याचं त्यांनी सांगितलं. याआधी शस्त्राचा आधार घेणारे आता शांतता आणि एकतेच्या मार्गावर ठाम विश्वास व्यक्त करत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
ईशान्य भारतातली घुसखोरी ब-याच प्रमाणात आटोक्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शांततेच्या व्यासपीठावर सर्व मार्ग सोडवून नवंभारताच्या निर्मितीसाठी लोकांनी एकत्र यायचं आवाहन त्यांनी केलं.
प्रधानमंत्र्यांनी आसाम सरकार आणि तिथल्या जनतेचं खेलो इंडिया क्रिडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केलं. विविध राज्यांमधून सहा हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. सरकारनं आता खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून, येत्या 22 फेब्रुवारीपासून कटक आणि भूवनेश्वर इथं या स्पर्धेला प्रारंभ होईल.