मुंबई : लोणावळा येथील ‘मगनलाल फूड प्रॉडक्ट्स’ या चिकीचे उत्पादन निकृष्ट दर्जाचे असल्याबाबतचे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले होते. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांना गुणवत्तापूर्ण अन्न मिळावे यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी दिली.

सदस्य शशिकांत शिंदे यांनी लोणावळा येथील मगनलाल फूड प्रॉडक्ट्स या चिकीचे उत्पादन निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री. येरावार बोलत होते.

श्री. येरावार म्हणाले, सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून, संबंधित कंपनीचे उत्पादन १४ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले होते. ठराविक नियमांची पूर्तता केल्याशिवाय उत्पादन सुरू करता येत नाही. तसेच, नियमित तपासणी कारवाईमध्ये ही बाब आढळून आली आहे. एकूण २५९ परवाने रद्द करण्यात आले आहे. अन्न भेसळसंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू असून, लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रस्त्यावरील पदार्थांपासून ते हॉटेलमधील पदार्थांचीही तपासणी करण्यात येतेअसेही श्री. येरावार यांनी यावेळी सांगितले.