पिंपरी : 1 जुलै 2019 पासून ‘ब’ क्षेत्रीय कार्यालाया अंतर्गत मनपा सेवेत असणारे मनपा आरोग्य अधिकारी मा. गोफणे, सहा आरोग्य अधिकारी इंदलकर तसेच चारही नगरसदस्य यांच्या उपस्थितीत, मनपाच्या घरोघरी कचरा उचलण्याच्या कामाला प्रारंभ झाला.

नवीन चकाचक कचरा गाड्या आणि कचरा एकत्रित करण्यासाठी भलेमोठे डंपर यांची मान्यवरांच्या हस्ते हार घालून पूजा करून नारळ फोडण्यात आले. त्यातील एक एक नारळ मी आणि आमचे जागृत नागरिक महासंघाचे सहसचिव उमेश सणस यांनीही फोडला. यावेळी प्रत्यक्ष कचरा गोळा करणाऱ्या महिला व पुरुष तसेच गाडी ड्रायव्हर आणि ठेकेदार सुपरवाईझर यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात आले.

“आजपासून शहरात कोठेही सोसायटीमध्ये कचरा दिसनार नाही” अशी ग्वाही पालिका अधिकाऱ्यांनी दिली, आम्ही मात्र कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रथम सुरक्षा साधने पूरवण्यासाठी ठेकेदाराला बजावले, नंतर “स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने” “देशसे ये वादा कर लिया हमने” ही मनपाची बहुचर्चित ट्यागलाईन गाडीवरील भोंग्यातून जोरजोरात वाजवत कचरा गाड्या आपापल्या भागात मार्गस्थ झाल्या.

चकाचक गाड्या आणि डंपरचा एवढा मोठा ताफा पाहून मला क्षणभर मनपाने शहराच्या स्वच्छतेबाबत बहुतेक भीष्म प्रतिज्ञा केली आहे की काय ? असे वाटले होते. पण कळविण्यास खेद वाटतो की, दोनच दिवसात ठेकेदाराने त्याचे खरे रूप दाखवायला सुरुवात केली आहे. हे सोबत जोडलेल्या फोटोंवरून लक्षात येईलच.

मनपाने घरोघरी कचरा गोळा करणे आणि शहरातील संपूर्ण कचरा एकत्र करण्यासाठी, आणि तो डम्पिंग यार्डात पाठवण्याचा कोट्यावधी रुपयांचा नवीन ठेका ठेकेदाराला दिला आहे. त्याची सुरुवात 1 जुलैला झाली पण, ठेकेदारांच्या कामावर लक्ष ठेवण्याची त्याच्यांंकडून काम करून घेण्याची जबाबदारी, मनपाच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आहे. पण सलग दोन दिवस एकदाही ठेकेदाराच्या त्या चकाचक कचरा गाडीने तानाजीनगरच्या बऱ्याच भागात साधे दर्शनही दिले नाही.

त्यामुळे अनेक सोसायट्याच्या प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याच्या बकेट भरून वाहत असल्याचे दृष्य पहावयास मिळत आहे. यामध्ये पालिका आरोग्य अधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणा दिसत आहे. शिवाय एलप्रो चौकात आणि रामकृष्ण मोरे सभागृहासमोर कचरा कुंड्या भरून कचरा रस्त्यावर वाहताना दिसून येत आहे.

महाशय जरी नवीन ठेका दिला तरी काम न करता, बिले मंजूर करून घेण्याची सवय रक्तात भिनलेल्या अभद्र वृत्तीला कोणीतरी पाठीशी घालते आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. पैशाचा भ्रष्टाचार आपण अनेकदा ऐकतो-पाहतो, पण आपल्या कर्तव्यात कसूर करून वर्तणुकीचा भ्रष्टाचार करणाऱ्या, मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे.

शहरातील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडविण्यास कारणीभूत ठरलेल्या प्रत्येक बाबींची तात्काळ चौकशी करावी आणि दोषींवर व ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत.

अशी मागणी जागृत नागरिक महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नितीन श.यादव, सचिव उमेश सणस व संघटनेचे पदाधिकारी यांच्यावतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांंना निवेदनाद्वारे करण्यात आली.