मुंबई : राज्यात ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य रवींद्र फाटक व महादेव जानकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
राज्यात ज्या-ज्या ठिकाणी अंमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असेल त्या ठिकाणी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत असे सांगून गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने 11 ठिकाणी छापे टाकले असून 42 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.
वरळी येथील पबमध्ये झालेली गर्दी व कोरोनाच्या नियमांचे झालेले उल्लंघन याबाबत दोन दिवसांत चौकशी करण्यात येईल व त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी गर्दीमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत लावलेली उपस्थिती व तेथे कोरोना नियमांचे झालेले उल्लंघन यासंदर्भात चालू अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानपरिषद सदस्य रामदास कदम, भाई जगताप, भाई गिरकर, निरंजन डावखरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.