मुंबई (वृत्तसंस्था) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात EPFO च्या एकंदर सभासद संख्येत या वर्षीच्या एप्रिलमध्ये १२ लाख ७६ हजारांची वाढ झाली आहे. कोविड-१९ ची दुसरी लाट आलेली असतानाही या महिन्यात सभासद संख्येत १३ पूर्णांक ७३ शतांश टक्क्यांनी वाढ झाली.
त्याआधीच्या महिन्यात सभासद संख्येत ११ लाख २२ हजार नव्या सभासदांची भर पडली होती. अलिकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या वेतनपत्रिकेसंबंधीच्या उपलब्ध आकडेवारीनुसार यावर्षी एप्रिलमध्ये EPFO मधून बाहेर जाणाऱ्या सभासदांची संख्या ८७ हजाराने कमी झाली असून नवीन सभासदांची संख्या ९२ हजारांहून अधिक आहे.
राज्यनिहाय वेतनपत्रिकांचा विचार केल्यास प्रामुख्यानं महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक ही राज्यं सर्वात पुढे असून तिथं निम्म्यांहून अधिक ईपीएफओच्या सभासदांची नोंदणी झाली आहे.