मुंबई (वृत्तसंस्था) : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शासकीय तसेच शासन अनुदानित स्वायत्त संस्थांमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्काव्यतिरिक्त इतर शुल्कात १६ हजार २५० रूपयांची सूट देण्याचा निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे.
मुंबईत राज्यातल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संस्थांच्या आढावा बैठकीत बोलत होते.शासकीय आणि शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्क शिवाय इतर शुल्क भरावं लागतं. मात्र कोविड काळात विद्यार्थी महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित नसल्यानं ग्रंथालय, जिमखाना अशा शैक्षणिक सुविधांचा वापर त्यांनी केला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून हे शुल्क घेऊ नये.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक यांच्या अडचणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी, यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुमारे २० हजार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल, असं सामंत यांनी सांगितलं.
या बैठकीत इतरही काही महत्त्वाचे निर्णय झाले. त्यात, या संस्थाना शिक्षक आणि शिक्षकेत्तर पदं कंत्राटी तत्वावर स्वतःच्या निधीतून भरायला मान्यता, संस्थांच्या २०२०-२०२१ च्या अर्थसंकल्पाला तत्वत: मान्यता, व्हीजेटीआयमधल्या मुलींच्या वसतिगृहाला ‘मातोश्री’ असं नाव देणं, इत्यादी निर्णयांचा समावेश आहे.