भारतात माध्यमे आणि मनोरंजन विश्वाच्या विकासाच्या संधींबाबत उद्योगजगत आशादायी
महोत्सव आयोजक इफ्फी 2019 मध्ये सहभागी होण्यास उत्सुक

नवी दिल्ली : टोरेंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, चित्रपटक्षेत्रातील भारतीय प्रतिनिधी मंडळाने आंतरराष्ट्रीय चित्रपट उद्योग जगतातील मान्यवरांची भेट घेतली. यावेळी इफ्फीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील विशेष आयोजनाबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच भारतात चित्रपट निर्मितीसाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना आणखी बळ कसे देता येईल, याविषयी चर्चा झाली. या प्रयत्नाचा भाग म्हणून चित्रपट उद्योगाशी संबंधित सर्व परवानग्या एकाच ठिकाणी देण्यासह अनेक उपक्रम राबवले जात आहेत. माध्यमे आणि मनोरंजन विश्वाच्या प्रगतीसाठी भारतात विपुल संधी आणि वाव आहे, हे लक्षात घेत, खाजगी क्षेत्राची त्यात गुंतवणूक आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

यावेळी बोलतांना, हार्टलैंड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कार्यक्रम प्रमुख, हनाह फिशर यांनी सूचना केली की “10 ऑक्टोबर 2019 पासून सुरु होणाऱ्या या महोत्सवात परदेशी भाषांच्या विभागात, भारतीय चित्रपटांवर विशेष भर दिला जाऊ शकेल. यामुळे इफ्फी 2019 च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या विशेष महोत्सवाचा प्रसार आणि माहिती जागतिक चित्रपटसृष्टीपर्यत पोहचवता येईल”.

भारतीय प्रतिनिधी मंडळाने यावेळी न्यूपोर्ट बीच फिल्म फेस्टिवलचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग शेवेंक यांचीही भेट घेतली. उत्तर अमेरिकेत भारतीय चित्रपट सृष्टीचा वावर वाढवून माध्यमे आणि मनोरंजन विश्वातल्या व्यावसायिक संधी भारतीय चित्रपट जगतासाठी शोधण्यावर भर देण्यात आला.

त्याशिवाय, जागतिक स्तरावर मनोरंजन आणि चित्रपट निर्मितीशी संबंधित मोठ्या उद्योग कंपन्यांच्या प्रमुखांशीही यावेळी चर्चा झाली. चित्रपट निर्मीतीचा एक आराखडा तयार केला जावा, याविषयी यावेळी चर्चा झाली. यावेळी भारतात चित्रीकरण करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया जलद गतीने करावी अशी सूचना उद्योग जगताने केली. यामुळे भारतात चित्रपट निर्मितीला चालना मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.