दक्षिण-पश्चिम मधील पट्टेधारकांना नोंदणीकृती मालकी हक्क प्रदान

नागपूर : शहराच्या विविध भागातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वत:च्या मालकीचे घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी पट्टे वाटपाची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून झोपडपट्टीधारकांना राहत असलेल्या जागेचे नोंदणी केलेले पट्ट्यांचे वाटप तत्काळ करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

रामगिरी येथे खामला, रामबाग, बोरकर नगर, सरस्वती नगर येथील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नोंदणी केलेल्या पट्ट्यांचे वाटप मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर श्रीमती नंदा जिचकार, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी लिना बुधे, नगरसेवक प्रकाश भोयर, पल्लवी शामकुळे, विजय चेटुले, लखन येरावार प्रामुख्याने उपस्थित होते.

झोपडपट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे यासाठी सर्व नियम शिथिल करण्यात आले असून पात्र ठरणाऱ्या प्रत्येक पट्टेधारकांना मालकी हक्काचे पट्टे तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

शहरात नझुल, महानगरपालिका, तसेच खाजगी जागांवर असलेल्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वितरणाला सुरुवात झाली असून खाजगी जागेवर असलेल्या 50 झोपडपट्ट्यांमध्ये पट्टेधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे यासाठी नियमात विशेष तरतूद करण्यात आली आहे. अशा झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षणसोबतच मोजणीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी. त्यानुसार पट्टे वाटपाची प्रक्रिया प्राधान्याने राबवावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिले.

झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे नोंदणी करण्यासाठी आवश्यक यंत्रणा वाढविण्यात येईल. त्यानुसार पात्र पट्टेधारकांना संबंधित यंत्रणेकडून मिळालेल्या डिमांडनुसार पैसे भरावे व आपल्या नावाने पट्टा करुन घ्यावा. मालकी हक्काचे पट्टे देताना आखिव पत्रिका सुध्दा नावाने होणार असल्यामुळे स्वत:च्या मालकीची व हक्काची जागा मिळणार आहे. संबंधित नगरसेवकांनी मालकी हक्काचे पट्टे वितरणासाठी नागरिकांना सहकार्य करुन पट्टे वाटपाची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.

नझुलच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाची प्रक्रियेला गती देण्यात आली असून 34 झोपडपट्ट्यांपैकी 23 झोपडपट्ट्यांमधील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मालकी हक्काचे पट्टे मिळण्यासाठी 2447 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील 5 झोपडपट्ट्या असून 3 झोपडपट्ट्यांचे प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मालकी हक्काचे पट्टे मिळण्यासाठी 248 नागरिकांना अर्ज केले असून त्यापैकी 113 अर्ज मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित अर्जांबाबत तत्काळ निर्णय घेण्यात येवून सर्व पात्र झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वितरित करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

महानगरपालिकेच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्ट्यांचे वितरण सुरु असून नागरिकांनी तत्काळ डिमांडनुसार पैसे भरुन आपल्या नावाने मालकी हक्काचा पट्टा करुन घ्यावा, असेही यावेळी आवाहन करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात खामला येथील शिवनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या विमल शितल हिंगणकर व राजेश हिंगणकर, कैलाश रतन सुतार व राधादेवी सुतार, कल्पना कैलाश पाटील, संगीता शाम चौधरी, आरती कैलाश समुद्रे यांना महसूल विभागातर्फे नोंदणी केलेले जागेचे कागदपत्र देण्यात आले.

महानगरपालिकेच्या रामबाग झोपडपट्टीत राहणाऱ्या श्रीमती सोनाली राजू तितरमारे, श्रीमती आशा सरजू राहूलकर, श्रीमती माया अशोक ठवरे, श्रीमती आरती शंकर गजभिये यांना नोंदणीकृत मालकी हक्काचे पट्टे वितरीत करण्यात आले. बोरकर नगर झोपडपट्टी येथील श्रीमती हिरा ओमप्रकाश लुढेकर, श्रीमती अर्चना मलखाम अहेरवार, सरस्वती नगर येथील श्रीमती पुष्पा दिनेश सर्पा, श्रीमती राजसबाई धर्मदास भागवत, श्रीमती नितु रुपेश मंडपे यांना मालकी हक्काचे पट्टे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले.