पुणे : महाराष्ट्रातील आघाडीचे सरकार विकास कामाबरोबरच समाजामध्ये सलोखा राखण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याच्या विकासासाठी सातत्यपूर्णपणे काम करत आहेत. नागरिकांच्या सेवेसाठी त्यांचा दिवस पहाटे सहा वाजल्यापासून सुरू होतो. त्यामुळे राज्याचा खऱ्या अर्थाने विकास साधण्यासाठी अजितदादा पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत असे मत अहमदपूर-चाकूरचे आमदार तथा पणन महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पुणे येथे आयोजित स्नेहमेळाव्यात व्यक्त केले.
पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात स्थायिक झालेल्या मराठवाड्यातील नागरिकांच्या भोसरीतील लांडेवाडीमध्ये घेण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. या वेळी माजी आमदार विलास लांडे, असिस्टंट कमिशनर श्याम पटवारी, उद्योजक गणपत बालवडकर, आरटीओ अधिकारी माधव सूर्यवंशी, पुणे महापालिकेतील कार्यकारी अभियंता शंकर सावंत, निवृत्त पोलिस अधिकारी शिवदत्त भारती, उद्योजक दयानंद कोते, माजी सरपंच संगमेश्वर जनगावे, बंदेनवाज चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या वेळी आमदार पाटील पुढे म्हणाले, “देशभरात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, गॅससह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. सामान्य नागरिकांनी याचा रस्त्यावर उतरून निषेध केला पाहिजे. त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणूकीमध्ये भाजपला त्यांची जागा दाखविली पाहिजे.”
माजी आमदार लांडे म्हणाले, “वाढत्या महागाईच्या काळात केंद्राद्वारे राज्याला कोणत्याही प्रकारचे सहाकार्य केले जात नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री राज्याच्या विकासाचे काम करत असताना विरोधक त्यांच्यासमोर विविध प्रकारचे अडथळे उभे करत आहेत.”