नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद लवकरच नवीन पक्ष स्थापन करणार असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या पक्षाचा पहिला गट स्थापन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जम्मू मध्ये सैनिक फार्म्स इथं एका जन -सभेला संबोधित करताना त्यांनी आज ही घोषणा केली. आपण जम्मू आणि काश्मीरच्या जनतेबरोबर असून आपल्या पक्षाचं नाव आणि झेंडा जनताच ठरवेल, असं ते म्हणाले.
गेल्या २६ ऑगस्ट रोजी काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर आझाद यांनी पक्षाची संपूर्ण सल्लागार यंत्रणा उद्ध्वस्त केल्याबद्दल, राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यावर आझाद राष्ट्रीय स्तरावरच्या स्वतंत्र पक्षाची स्थापना करतील, असा अंदाज वर्तवला जात होता. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी ही घोषणा केली. मात्र, आझाद यांच्यासमोर जम्मू-काश्मीरच्या नॅशनल कॉन्फरन्स अथवा पीडीपी यासारख्या मुख्य प्रवाहातल्या पक्षांबरोबर युती करण्याचा पर्याय असेल.