नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांग आणि वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांचं जीवन सुसज्ज, संपन्न ,समृद्ध, आणि आनंददायी होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिना निमित्तानं आयोजित कार्यक्रमात केंद्र सरकारच्या वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना निशुल्क सहायक उपकरण वितरण समारंभात बोलत होते.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक आमदार, वरिष्ठ नागरिक उपस्थित होते. सेवा कार्याचा हा कार्यक्रम आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाची भेट म्हणून अर्पण करत असल्याचं गडकरी म्हणाले. यावेळी मध्य नागपुरातील तब्बल 32 हजार दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना गरजेनुसार निशुल्क सहायक साहित्य वितरित करण्यात आलं. नागपूरात अडीच लाख नागरिकांना या योजनेतून साहित्य वाटप करण्यात आलं असून शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय हे वाटप करण्यात आलं आहे.