नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुर्गम भागातल्या रुग्णांसाठी एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतल्या तज्ञ डॉक्टरांनी सॅटेलाइट केंद्रांच्या माध्यमातून दूर-दृश्य प्रणालीद्वारे टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नागपूरच्या एम्सच्या चौथ्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
आरोग्यविषयक समस्या कुठल्याही क्षणी उद्भवत असतात. त्यामुळे आता आरोग्य विषयक संस्थांमध्ये रुग्णांना भरती करून घेण्याची सुविधा २४ तास उपलब्ध करण्याबाबत विचार व्हायला हवा, असं ते म्हणाले. नागपूरच्या आसपासच्या भागात विशेष करून सिकल, अॅनिमिया तसंच थॅलेसेमिया सारख्या समस्या असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात, यावर संशोधन व्हायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अवयव प्रत्यारोपणासारख्या सोयी सामान्य लोकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न व्हायला हवे असे गडकरी म्हणाले.