नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज टोकियो इथं जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्यावर शासकीय इतमामात होणाऱ्या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी ते आज सकाळी टोकियो इथं दाखल झाले. सकाळी त्यांनी आबे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. आबे यांच्या निधनाबद्दल मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं. खुल्या, मुक्त, समावेशक भारत प्रशांत क्षेत्राची संकल्पना राबवण्यासाठी तसंच भारत जपान संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आबे यांनी दिलेल्या योगदानाचा त्यांनी उल्लेख केला.
मोदी यांनी जपानचे प्रधानमंत्री फिजिओ किशिदा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. मोदी आणि किशिदा यांनी अनेक प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली. भारत जपान यांच्यातले विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीचे संबंध अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा या बैठकीत पुनरूच्चार करण्यात आला. ही चर्चा फलदायी होती, असं मोदी यांनी बैठकीनंतर सांगितलं.