नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बॅंक आजपासून प्रायोगिक तत्वावर डिजिटल चलन सुरु करत आहे. हा डिजीटल रुपया टोकनच्या रुपात राहणार असून त्याला कायदेशीर मान्यता आहे. काही ठराविक जागांवर हे चलन ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना मर्यादित वापरकर्त्यांच्या गटात उपलब्ध होणार आहे. या चलनाचं मूल्य कागदी आणि नाण्यांच्या मूल्यांइतकच राहणार असून याद्वारे मध्यस्थी बॅंका आणि कर्ज देणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करता येणार आहे. यासाठी आठ बॅंका निश्चित करण्यात आल्या आहेत. या चलनाची सुरवात पहिल्या टप्प्यात मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरु आणि भुवनेश्वर मध्ये केली जाणार आहे. त्यानंतर अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैद्राबाद, इंदौर, कोच्ची, लखनऊ, पाटणा आणि सिमल्यात केली जाणार आहे.
वापरकर्त्याच्या मोबाईल फोन वर बॅंकेनं उपलब्ध करुन दिलेल्या डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून या डिजिटल पैशांची देवाणघेवाण करता येणार आहे. डिजिटल चलन हे रिझर्व बँकेकडून जारी करण्यात येणाऱ्या रोख रुपयांचं डिजिटल रुप असून संपर्क रहित व्यवहारांमध्ये याचा वापर करता येईल. याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यावर्षीच्या अंदाजपत्रकात केली होती.