नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात गुंतवणुकीची अफाट क्षमता असून परदेशस्थ भारतीय तरुणांनी भारतात संशोधनकार्य आणि गुंतवणूक करावी असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा आणि युवा कल्याणमंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. इंदूर इथं प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रवासी भारतीय युवा परिषदेला संबोधित करताना ठाकूर म्हणाले की, अंतराळ आणि ड्रोन ही गुंतवणुकीसाठी नवीन क्षेत्रं आहेत.
मध्य प्रदेशात इंदूर इथं आजपासून तीन दिवसीय प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाला सुरुवात झाली. कोरोना संसर्गाच्या काळाचा संदर्भ देत ठाकूर म्हणाले की या आपत्तीच्या काळात आपण जगावर अवलंबून नव्हतो. भारतानं 200 कोटींहून अधिक लसीकरण तर केलंच पण त्याबरोबर 100 हून अधिक देशांनाही लस उपलब्ध करून दिली. भारतानं काय केलं याची कल्पनाही जगातले देश करू शकत नाहीत असंही ते पुढे म्हणाले.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा उल्लेख करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, 200 वर्षं आपल्यावर राज्य करणाऱ्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून आपण पुढे निघालो आहोत. नागरिकत्वाच्या पलीकडे जाऊन रक्ताच्या आणि भारतीयत्त्वाच्या नात्याकडे पाहून मोदी सरकार काम करतं असं ते म्हणाले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि ऑस्ट्रेलियन खासदार जनेता यांनीही या परिषदेला संबोधित केलं. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे युवा व्यवहार मंत्री निसिथ प्रामाणिकही या उपस्थित होते.
या अधिवेशनाचं औपचारिक उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जगात आपली विशिष्ट ओळख निर्माण करणारा अनिवासी भारतीय समुदायासोबत संबंध दृढ करण्याची ही एक चागली संधी आहे, असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.