नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पराक्रम दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली अर्पण केली आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्यासाठी नेताजींनी लाखो भारतीयांना प्रेरित केलं.
देश कायम त्यांचा ऋणी राहील, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पराक्रम दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली. सुभाषचंद बोस यांनी देशाच्या इतिहासात दिलेल्या अविस्मरणीय योगदानाचं आपण स्मरण करत असून, वसाहतवादी राजवटीला त्यांनी केलेल्या प्रखर विरोधासाठी ते कायम स्मरणात राहतील, असं त्यांनी म्हटलं आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी खोलवर प्रभावित होउन भारतासाठीचं त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण काम करत आहोत, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
अंदमान निकोबार द्वीप समूहांमधल्या २१ बेटांचं नामकरण परमवीर चक्र सन्मानप्राप्त शूरांच्या नावावरून करण्याचा कार्यक्रम पराक्रम दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. पोर्ट ब्लेअर इथल्या समारंभाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना त्यांनी नागरिकांना पराक्रम दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचं प्रधानमंत्र्यांनी अनावरण केलं. गृहमंत्री अमित शाह यावेळी उपस्थित होते.
अंदमान निकोबार द्वीप समूहातल्या बेटांना परमवीरचक्र पुरस्कार विजेत्यांचं नाव देण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमामुळे हे वीर योद्धे कायम स्मरणात राहतील असं ते यावेळी म्हणाले. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान या कार्यक्रमाला उपस्थित होते.नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईत राजभवन इथं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी पराक्रम दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. सबळ राष्ट्रवादाची मूल्य आणि विचारांचं उत्तम उदाहरण म्हणून ते कायम स्मरणात राहतील असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.