नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधीसाठी ‘बीआयएमएसटीईसी’ (BIMSTEC) देशांना निमंत्रण देत भारतीय उपखंडातील आपल्या शेजार्‍यांना एक सकारात्मक संदेश दिला आहे. चीनच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्याबरोबरच पाकिस्तानला भारतीय उपखंडात एकटे पाडण्यासाठी या कूटनीतीला विशेष महत्त्व आहे.

गतवेळच्या शपथविधीवेळी ‘सार्क’ देशांना निमंत्रण देत मोदींनी एक नवी सुरुवात केली होती. भारतीय उपखंडात भारत हाच मोठा भाऊ आहे, असा स्पष्ट संदेश देत मोदी यांनी चीनच्या वाढत्या मुजोरीला काटशह देण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर आता यावेळी ‘बीआयएमएसटीईसी’ देशांना निमंत्रण देत मोदींनी चीनसह पाकिस्तानलादेखील इशारा दिला आहे.

पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याची सुरुवात आपल्या पहिल्या कार्यकाळात मोदींनी केली होती. शपथविधीस पाकिस्तानी पंतप्रधानांना देण्यात आलेले निमंत्रण, लाहोरमध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची अचानक घेतलेली भेट, याद्वारे पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास भारत इच्छुक असल्याचा संदेश देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पठाणकोट, उरी आणि पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यांमुळे पाकिस्तानला शांतता नको असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच यावेळी पाकिस्तान वगळता उपखंडातील भूराजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असणार्‍या जवळपास सर्व राष्ट्रांना निमंत्रण देत आगामी काळात पाकिस्तानची सर्वतोपरी कोंडी करण्याचे संकेत मोदींनी दिले आहेत.

भारतीय उपखंडात हात-पाय पसरण्याचा प्रयत्न चीन काही काळापासून करीत आहे. भारताच्या शेजारी देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे अथवा सैनिकी बळाचा वापर करीत त्यांच्यावर प्रभुत्व गाजविण्याचा चीनचा प्रयत्न आहे. श्रीलंकेतील हंबनटोटा बंदराचे प्रकरण, भूतान येथील डोकलाम वादामुळे समोरासमोर उभे ठाकलेले भारत-चीनचे सैन्य, नेपाळबरोबर चीनची वाढती जवळीक, या सर्व घटनांचा विचार करता या देशांसोबत संबंध अधिक भक्कम करण्यासाठी आणि पाकिस्तान व चीनची नाकेबंदी करण्यासाठी भारताने कंबर कसली आहे.